साखर उद्योगासाठी पुढील वर्ष कडू : शरद पवार
देशात आणि राज्यातही पुढील वर्षी ऊस पिकाखालील क्षेत्र प्रचंड आहे. म्हणून साखर उद्योगासाठी पुढील वर्ष हे अडचणीचे असून, कारखान्यांनी आतापासून गाळपाची आखणी करायला हवी; शिवाय कारखान्यांनी खर्चात काटकसर करून कारखाने चालविले पाहिजेत, असा सल्ला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे दिला. शरद पवार म्हणाले, अंतरानुसार ऊस तोडणी वाहतुकीच्या खर्चाच्या निर्णयामुळे कारखान्याच्या जवळ ऊस असलेल्या शेतकर्यांचा वाहतुकीचा खर्च कमी होईल; पण बाहेरून ऊस आणावा लागेल; तरच कारखाने चालणार आहेत. पुढील वर्षी कारखाने जादाऊस उपलब्धतेमुळे लवकर सुरू होतील. कमी ऊस असलेल्या कारखान्यांनी जास्त ऊस असलेल्या कारखान्यांकडील ऊस गाळपासाठी पुढे यायला हवे. त्याचे योजन आतापासून केले नाही, तर पुढील वर्षी जूनपर्यंत गाळप करण्याची वेळ येऊ शकते.

No comments:
Post a Comment