Friday, 23 March 2018

८२४ कोटींचा आणखीन एक घोटाळा उघड

८२४ कोटींचा आणखीन एक घोटाळा उघड

देशात बँक घोटाळ्यांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदी आणि त्याच्या मामाने केलेला घोटाळा ताजा असतानाच आता चेन्नईतील कनिष्क गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने देशातील विविध १४ बँकांना ८२४ कोटी रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १४ बँकांच्या गटाने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर सीबीआयकडून या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्कचे कार्यालय चेन्नईमध्ये असून भूपेश कुमार जैन व त्याची पत्नी नीता जैन हे प्रवर्तक व संचालक आहेत. हे दोघेही मॉरिशसला पळून गेल्याचा संशय आहे. दोघांनाही संपर्क होत नसल्याचे स्टेट बँकेने म्हटले आहे. लेखापरीक्षकांना हाताशी धरून त्यांनी हा घोटाळा केल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीसंदर्भात दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 'क्रिझ' या ब्रँडनेम खाली या कंपनीकडून सोने विक्री होत होती. मार्च २०१७ पासून या कंपनीने बँकांना गंडा घालण्यास सुरूवात केली होती अशी माहिती आहे. मार्चमध्ये पहिल्यांदा ८ बँकांचे व नंतर संपूर्ण १४ बँकांचे हप्ते देण्याचे या कंपनीने बंद केले होते. त्यानंतर बँकांनी कंपनीने दिलेल्या पत्त्यावर जाऊन भेट दिली असता तिथे कोणीच नसल्याचे दिसून आले. 

No comments:

Post a Comment